सोलापूरात विमानसेवा सुरू   

गोवा-सोलापूर मार्गासाठी आरक्षण

सोलापूर, (प्रतिनिधी) :  गोवा येथील प्रादेशिक विमानसेवा पुरवणार्‍या फ्लाय ९१ ने गोवा ते सोलापूर दरम्यान थेट उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या मार्गामुळे फ्लाय ९१ भारतातील एकूण आठ शहरांपर्यंत थेट विमानसेवा उपलब्ध करून देणार असून, यात महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि आता सोलापूर यांचा समावेश आहे. गोवा-सोलापूर दरम्यानची ही थेट विमानसेवा प्रवाशांसाठी प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सुलभ करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 
गोवा-सोलापूर मार्गासाठी बुकिंग आता सुरू झाले असून, तिकिटे फ्लाय९१च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. फ्लाय ९१ एक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देत आहे. यामुळे गोव्याच्या समृद्ध पर्यटनाला आणि सोलापूरच्या धार्मिक व औद्योगिक वैशिष्ट्यांना दोन्ही भागांतील प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि सहज करता आले आहे.
 
सोलापूर हे नैऋत्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून, ते आपल्या समृद्ध कापड उद्योगासाठी आणि औद्योगिक विकासासाठी ओळखले जाते. याच बरोबर, सोलापूर हे धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण ते पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), तुळजापूर (तुळजाभवानी मंदिर), अक्कलकोट (स्वामी समर्थ महाराज मंदिर), गंगापूर (श्री नरसिंह सरस्वती स्वामी मठ) आणि भीमाशंकर या पाच प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे सोलापूर हे औद्योगिक आणि धार्मिक वारशाचा संगम असलेले शहर आहे.
 
गोवा-सोलापूर मार्गाची सुरुवात ही पारंपरिकपणे कमी सेवा असलेल्या भागांमधील हवाई संपर्क सुधारण्यावर फ्लाय ९१ चा लक्ष केंद्रित असल्याचे अधोरेखित करते, असे फ्लाय ९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले. सोलापूर हे केवळ एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र नाही, तर महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्र सर्किटमधील एक प्रमुख धार्मिक केंद्र देखील आहे. आमच्या विमानसेवेमुळे यात्रेकरूंना तसेच व्यवसाय आणि आरामदायी प्रवास करणार्‍यांना या प्रदेशात सहज आणि सुरक्षित प्रवास करता येईल, असे ते पुढे म्हणाले.
 
सोलापूरमध्ये विस्तार करताना आम्हाला अमूल्य पाठिंबा देणार्‍या नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इतर सर्व भागधारकांचे फ्लाय ९१ ने आभार मानले आहेत.

Related Articles